पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांची पाली भाषेसाठी शिष्यवृत्ती

 धर्मानंद कोसंबींना फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतर प्राध्यापकांपेक्षा दरमहा २५ रु. कमी वेतनावर ही नोकरी देण्यात आली. याच दरम्यान सयाजीराव महाराज मुंबईत आले होते. त्यावेळी कोसंबींनी महाराजांना भेटून हे सर्व सांगितले. कमी पगारावर नोकरी स्वीकारल्याबद्दल महाराज त्यांना रागावले. महाराज म्हणाले, ‘हे तुम्ही काय केलेत? नोकरी स्वीकारण्यापूर्वी तुम्ही मला भेटायला नको होते काय? अमेरिकेला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत नोकरी करून आलात, आणि आता दरमहा ७५ रुपये आपली किंमत ठरविता, हे तुम्हास योग्य वाटते काय?

 महाराजांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोसंबींनी त्यांचे समाधान करण्याच्या उद्देशाने आपली भूमिका महाराजांपुढे विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोसंबी महाराजांना म्हणाले, ‘महाराजसाहेब, आल्याबरोबर मी आपणास भेटलो नाही ही चूक झाली. तिजबद्दल मला क्षमा करावी. परंतु फर्ग्युसन कॉलेजांत नोकरी पत्करण्यात माझी चूक झाली असे वाटत नाही. पगारावरून किंमत ठरवण्यात आली तर आगरकर, गोखलेप्रभृतींची किंमत फारच कमी ठरेल! मला वाटते की, माझ्या कार्यावरून माझी किंमत ठरेल, पगारावरून ठरणार नाही. माझ्या कार्यात यश आले नाही, तर निदान मोठ्या पगाराने स्वतःचा फायदा करून घेतला, हा आळ तरी येणार नाही.' कोसंबीच्या या स्पष्टीकरणानंतर मात्र महाराज कोसंबींवर रागावले नाहीत.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १६