पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यानंतर कोसंबींनी महाराजांना फर्ग्युसन कॉलेजमधील पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची विनंती केली. महाराजांनी ही विनंती मान्य करून दर महिन्याला १५ रु. च्या २ आणि १० रु. च्या २ अशा एकूण ४ शिष्यवृत्ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू केल्या. या चार शिष्यवृत्ती १९१२ ते १९१८ या कालावधीत कोसंबी या कॉलेजमध्ये नोकरीत असेपर्यंत चालू राहिल्या. विशेष म्हणजे मुंबई प्रांतातील हे एकमेव कॉलेज होते जेथे पाली भाषा शिकविली जात होती. कोसंबींमुळे फर्ग्युसन कॉलेज पाली भाषा सुरू करू शकले.

 अजून एका बाबीचा उल्लेख येथे मनोरंजक ठरतो. १९१२ मध्ये कोसंबींनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत कार्ल मार्क्सवर भाषण दिले. तो कार्ल मार्क्सचा भारताला परिचय करून देण्याचा पहिला सार्वजनिक प्रयत्न होता. कॉ. डांगे यांनी मार्क्सच्या विचारधारेवरील 'सोशॅलिस्ट' हे नियतकालिक १९२२ ला सुरू केले व १९२५ ला भारतीय मार्क्सवादी पक्षाची स्थापना केली. म्हणजे डांगेंच्या अगोदर दहा वर्षे कोसंबींनी मार्क्स भारतात आणला. कोसंबींना मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा परिचय अमेरिकेत झाला. म्हणजेच मार्क्सच्या भारतातील आगमनास सयाजीरावांचा हातभार होता असे म्हणता येईल. कोसंबी पुढे एकूण चार वेळा बौद्ध धर्माच्या अभ्यासानिमित्त अमेरिकेला गेले.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १७