पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव आणि बौद्ध धर्म

 सयाजीरावांनी 'महाराष्ट्राला काय दिले याचा शोध घेण्याच्या या प्रवासातील 'कोसंबी' हा थांबासुद्धा महाराष्ट्राला उपयुक्त ठरला. कारण धर्मानंद आणि सयाजीराव यांच्या १९०६ पासूनच्या नात्याचा धागा बौद्ध धर्म हाच होता. ज्यावर्षी कोसंबी बौध्द धर्मावरील संशोधनाला मदत करण्यासाठी सयाजीरावांच्या परवानगीने अमेरिकेला गेले त्याचवर्षी महाराजांनी बडोद्याच्या ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा बसविला. साधारणपणे १८९८ पूर्वीपासूनच सयाजीरावांचा बुद्धाशी चांगला परिचय होता असे केळुसकर चरित्र आधारे म्हणता येईल. सयाजीरावांनी पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे मराठी अनुवाद अग्रक्रमाने प्रकाशित करण्याची सूचना यंदे यांना दिली होती. त्यांच्या धर्मविषयक भाषणात बुद्धाचा गौरवाने उल्लेख वारंवार आढळतो हा अपघात नाही. महाराजांनी महाराष्ट्रात बौद्ध धर्म प्रसारासाठी बाबासाहेबांच्या धर्मांतरापूर्वी ५० वर्षे साहाय्य करून चांगली सुरुवात केली होती असे म्हणता येईल. त्यामुळे बौद्ध धर्माचा महाराष्ट्रालाच काय आधुनिक काळात भारताला परिचय करून देणारे पहिले प्रशासक म्हणूनही त्यांचे योगदान मोठे होते. कोसंबी हा त्यातील एक टप्पा होता इतकेच.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १८