पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मानंद कोसंबी : ऋण नाकारणारे अनुयायी
 केळुसकरांचे १८९८ मध्ये प्रकाशित झालेले फक्त मराठीतीलच नव्हे तर कोणत्याही भारतीय भाषेतील पहिले बुद्ध चरित्र वाचून धर्मानंद कोसंबी, डॉ. आनंदराव नायर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वजण बुद्धाशी जोडले गेले. केळुसकरांचे मराठी संस्कृतीला हे फार मोठे योगदान आहे. याची चर्चा आपण मागे केलीच आहे. बुद्धाच्या समतावादी विचाराशी सयाजीरावांचे अगदी सुरुवातीपासूनचे नाते होते. बुद्ध साहित्याला बडोद्यातील साहित्य प्रकाशनात महाराजांनी अग्रक्रम दिला होता. केळुसकरलिखित ' गौतमबुद्धाचे चरित्र' वैज्ञानिक दृष्टीने बुद्धाचा शोध घेणारे असल्यामुळे आजही त्याचे मोल कमी झालेले नाही.

 या चरित्राबाबत 'एवढ्या आवडीने, प्रेमाने आणि प्रचंड जीव ओतून आपण दुसरा ग्रंथ लिहिलेला नाही' असे स्वतः केळुसकरांनी म्हटले आहे. या ग्रंथात बुद्धाचे समग्र चरित्र असून बौद्ध धर्माच्या मतांचा सारांश व त्याच्या प्रसाराचा संक्षिप्त इतिहास केळुसकरांनी दिला आहे. बुद्ध चरित्रात लेखकाचे अफाट वाचन, मूलगामी विचार, वैचारिक सामर्थ्य आणि समर्थ लेखणीचे दर्शन घडते. मराठी भाषेतील हा एक उत्कृष्ट चरित्र ग्रंथ असल्याचे मत तत्कालीन अनेक तज्ज्ञांनी नोंदवले होते. बडोद्याच्या दक्षिणा प्राइज कमिटीने या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरविले होते.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १९