पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्मानंद कोसंबी यांनी केळुसकरलिखित बुद्ध चरित्र डॉ. भांडारकरांना वाचून दाखविले. या ग्रंथाच्या वाचनामुळेच कोसंबी बौद्ध धर्माकडे वळले. बुद्ध चरित्राच्या वाचनाने प्रभावित झालेल्या कोसंबींनी ग्रंथाचे लेखक केळुसकरांना भेटण्याची इच्छा काशीनाथ रघुनाथ या आपल्या मित्राकडे व्यक्त केली. परंतु पुढे अनेक वर्षानंतर आपल्या 'निवेदन' या आत्मवृत्तात 'गोविंद नारायण काणेकृत 'जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र' वाचून आपण तल्लीन झाल्याचे' धर्मानंद कोसंबी नोंदवतात.

 गोविंद नारायण काणेकृत 'जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र' हे जुलै १८७९ मध्ये लंडनहून प्रकाशित झालेल्या एडविन अर्नोल्ड यांच्या 'लाइट ऑफ एशिया' या पद्यमय ग्रंथाचे भाषांतर आहे. गोविंद काणेंचे बुद्धचरित्र वाचून बौद्ध धर्माचे ज्ञान संपादणे हे आपले जीवितकार्य निश्चित केल्याचे धर्मानंद कोसंबी आपल्या आत्मवृत्तात नोंदवतात. पुढे समग्र बौद्ध वाङ्मयाचे अवलोकन केल्यावर धर्मानंद कोसंबींनी केळुसकरांच्या बुद्ध चरित्राविषयी मतभेद व्यक्त केले. केळुसकरांची वैज्ञानिक दृष्टी विचारात घेता हे मतभेद बौद्धिक नव्हते तर बुद्ध परंपरा आधुनिक भारतात आपल्यापासून सुरू होते हे ठसवण्याचा एक 'कोता' प्रयत्न होता असेच आज म्हणावे लागते.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / २०