पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बौद्ध धर्मावर चर्चा केली. केळुसकर त्यांच्या आत्मचरित्रातही आठवण सांगताना सयाजीरावांचे बौद्ध धर्माचे ज्ञान १८९८ ला परिपूर्ण होते असा अनुभव नोंदवतात.
 केळुसकरांचे हे बुद्धचरित्र वाचून मुंबईचे डॉ. ए. एल. नायर, धर्मानंद कोसंबी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाकडे वळले. हा इतिहास फारच क्रांतिकारक आहे. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकात दक्षिण भारतात बौद्ध धर्म साहित्य आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासाने गती घेतली. पुढे राहुल सांस्कृतायण यांनी नेपाळ, तिबेट यासारख्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात बौद्ध साहित्य भारतात आणले. या सर्व पार्श्वभूमीवर १९५६ चे बाबासाहेबांचे धर्मांतर झाले.

 केळुसकरांकडून प्रेरणा घेऊन कोसंबींनी बौद्ध साहित्य आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात मोठे योगदान दिले. बौद्ध धर्म आणि पाली भाषा यांच्या प्रसाराची सयाजीरावांनी कोसंबींना दिलेली जबाबदारी हा एक महत्त्वाचा टप्पा होता. सयाजीरावांनी त्यांच्या प्राच्यविद्या संस्थेतर्फे बौद्ध धर्मासाठी केलेले काम, पाली भाषेला राजाश्रय, मराठीत सर्वाधिक बौद्ध धर्मविषयक ग्रंथांचे प्रकाशन आणि महत्त्वाचे म्हणजे महाराजांचा स्वतः चा बौद्ध धर्मविषयक व्यासंग याबाबत आपल्याकडे फार मोठे अज्ञान आहे. म्हणूनच सयाजीराव आणि कोसंबी यांचा बौद्धधर्म केंद्रस्थानी ठेवून विचार करणे आवश्यक ठरते.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / ७