पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चुलतीच्या मरणाच्या तिसऱ्या दिवशी कोसंबींना भेटीला बोलवून घेतले. चुलतीच्या मृत्यूमुळे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवता येत नव्हता. त्यामुळे विस्तृत चर्चा झाल्यानंतर महाराजांनी कोसंबींना सांगितले की या बाजूला पुन्हा आल्यानंतर भेटल्याशिवाय जाऊ नका. यावेळी महाराजांनी कोसंबींना जाण्यायेण्याच्या खर्चासाठी १६० रु. दिले आणि कोसंबी कलकत्याला निघून गेले.

 कलकत्याला गेल्यानंतर कोसंबींचा महाराजांशी काहीही पत्रव्यवहार होऊ शकला नाही. पुढे एक वर्षाने कोसंबींना कलकत्याला बडोद्याच्या हुजूरकामदाराचे एक पत्र आले. या पत्रात ‘महाराज सरकार अधूनमधून तुमची आठवण काढीत असतात व या बाजूला आल्यास तुम्ही बडोद्याला येऊन भेटावे अशी त्यांची इच्छा आहे' असा उल्लेख केला होता. परंतु कोसंबींना त्यावेळी कॉलेजमधील कामाच्या व्यग्रतेमुळे महाजांच्या इच्छेनुसार बडोद्याला जाणे तत्काळ शक्य नव्हते. त्यामुळे कोसंबींनी महाराजांच्या' पत्राला उत्तर देत महाराजांशी भेटण्याची त्यांचीही इच्छा असल्याचे कळविले. या पत्रात कोसंबी लिहितात, 'सध्या महाराजसाहेबांना भेटता येणे शक्य नाही. परंतु उन्हाळ्याची सुटी झाल्यानंतर भेटता येईल. त्यापूर्वी महाराजांची स्वारी कोठे आहे याची चौकशी करून मी भेटीस येईन.'

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / ९