पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

" संस्थेतर्फे प्रसिद्ध होणारी सुविख्यात “गायकवाड प्राच्य ग्रंथमाला” (गायकवाड ओरिएन्टल सिरिज) आज सुधारलेल्या सर्व जगात प्रसृत असून, तिने संस्थानाला सर्व जगात अखंड कीर्ती प्राप्त करून दिली आहे. अभ्यासयुक्त संस्करणानंतर अनेक पोथ्या, पुस्तके ही संस्था प्रसिद्ध करते. प्राचीन हिंदी, संस्कृती व इतिहास यांना उपकारक अशी महत्त्वाची व मौलिक साधने या मालेतून प्रसिद्ध झाली असून, नष्टप्राय समजले गेलेले किती तरी ज्ञान या संस्थेने विस्मृतीतून प्रकाशात आणले आहे.”

 जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती व नियतकालिकांचे 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' विषयीचे विशेष अभिप्राय उपलब्ध आहेत. या सिरिजविषयी 'फ्रेंच स्कूल ऑफ ओरिएन्टॅलिस्ट'चे डीन सेल्व्हिन लेवी म्हणतात, “भारतात सध्या प्रकाशित होणाऱ्या अशा सिरिजमध्ये ही सिरिज सर्वश्रेष्ठ आहे.” लंडनमधील ‘एशियाटिक रिव्हू' या नियतकालिकाने, " पौर्वात्य देशातील अशा सिरिजमधील ही एक सर्वोत्तम सिरिज आहे.” असा उल्लेख केलेला आढळतो. तर 'द लंडन टाइम्स'च्या साहित्यविषयक पुरवणीमध्ये 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' विषयी महत्त्व अधोरेखित करताना केलेला उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. “पाश्चात्य ज्ञान व्यवस्थेसाठी एक मौल्यवान उपलब्धी आहे. याचे श्रेय संपादकांबरोबर सयाजीरावांनाही आहे."

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १३