पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शास्त्रांवरील मूलभूत सिद्धांत असणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ आहे. या पुस्तकामध्ये ठिकठिकाणी आकृत्यांचा समावेश करून सोप्या पद्धतीने सिद्धांतांची मांडणी केली आहे. १८९३ मध्ये संस्थानामार्फत विद्वान लेखक नोकरीत ठेवून त्यांच्याकडून ग्रंथ लेखनाचे काम करून घेण्याची व्यवस्था केली.
 १९०८ मध्ये विद्याधिकारी खात्याच्या देखरेखीखाली महाराजांनी भाषांतर शाखा नवीन पद्धतीवर स्थापन केली. इंग्रजी ग्रंथांप्रमाणेच संस्कृत भाषेतील उत्तम आणि दैनंदिन उपयोगाच्या पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्यास सुरुवात झाली. यासाठी श्रावणमास दक्षिणेपैकी ५,५०० रु. दिले. नंतर याच निधीतून धर्मशास्त्रावरील पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी वार्षिक १० हजार रु. खर्च करण्याचा हुकूम काढला.

 १८७८ पासून मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवण्यास सुरुवात झाली. १९०९ मध्ये बडोद्यात झालेल्या संमेलनावेळी हे नाव बदलून 'मराठी साहित्य संमेलन' असे व्यापक नामाभिधान देण्यात आले. १९०९ पर्यंत या संमेलनास 'मराठी ग्रंथकारांचे संमेलन' असे नाव होते. मुंबई येथील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक के. आर. कीर्तीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे कीर्तीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते. सयाजीराव महाराजांनी संमेलनात प्रत्यक्ष भाग घेतानाच साहित्य प्रकाशनाच्या कार्याकरिता २ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी बाजूला काढून त्या

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २२