पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

...सध्याच्या शास्त्रीय युगांत ज्या विद्येची चांगली निगा कोठेही फारशी होत नाही व हेटाळणी मात्र प्रत्यही होत आहे अशा या गीर्वाण विद्येच्या उत्कर्षाकरिता, तिच्यामधील कालक्रमानुसार दोष काढून टाकून, तिची बळकट पायावर पुनश्च प्रतिष्ठापना व्हावी म्हणून, दर्शविलेल्या अनेक मार्गांनी, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कारकीर्दीत यशस्वी प्रयत्न होत असलेले पाहून, सध्याच्या निबीड निराशामय युगांतसुध्दा मना क्षणभर भावी कालाबद्दल आशेचा ओलावा वाटतो.”
 २२ मार्च १९३३ मध्ये महाराजांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला भेट दिली. त्यावेळी झालेल्या सत्कारात उत्तर देताना महाराज म्हणतात, “कोणी कितीही नव्या मताचा असला तरी जुन्या राष्ट्रीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा त्याने सांभाळलाच पाहिजे, हे कार्य संशोधनानेच होत असते. राजेलोक स्वत: विद्वान किंवा संशोधनशास्त्रात निपुण नसतील; परंतु त्यांना या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्थेत चाललेले प्रचंड काम पाहून मला फार संतोष झाला आहे व मी तुमच्या कार्याबद्दलची माझी सहानुभूती कोणत्या ना कोणत्या रीतीने प्रकट करी" महाराजांनी  १९१६ मध्ये या भांडारकर संस्थेला स्थापनेसाठी १ हजार रु.ची आर्थिक मदत केली होती.

१९१६ पासून पुढे १९४० पर्यंत एकूण २४ वर्षे वर्षाला पाचशे रुपये वर्षासन असे एकूण १२,००० रु. चे आर्थिक साहाय्य महाराजांकडून करण्यात आले. १९२२ मध्ये या संस्थेला

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २८