पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रामविकास, स्त्रीजीवन, आरोग्य आयुर्वेद, पौराणिक पात्रे, ऐतिहासिक शूरवीर, संतचरित्र वगैरे विविध प्राचीन व अर्वाचीन समाजोपयोगी विषयांची प्रकाशने आहेत. आजसुद्धा प्रतिवर्षी या विभागाद्वारा विविध पुस्तके प्रकाशित होत आहेत. जगातील सर्वोत्तम काम करण्याच्या महाराजांच्या कार्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून महाराजांची प्राच्यविद्येतील कामगिरी भारताचा सन्मान वाढवणारी आहे.
 संस्थेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत व्यवस्थित पद्धतीने जतन केलेल्या व दुर्मिळ अशा ५,००० पेक्षा अधिक नवी व जुनी पुस्तके व मासिकांचा संग्रह हा या विभागाचा विशेष आहे. संशोधन, संपादन व अध्यापनासाठी अशा प्राच्यविद्यासंबंधी अनेक विषयांच्या पुस्तकांची गरज सर्वांनाच भासते. त्यामुळे सर्व विद्याशाखेच्या अभ्यासकांना उपयुक्त अशा दुर्मिळ पुस्तकांमधील संदर्भसामग्री मिळत असल्याने हा विभाग भारतीय व विदेशी संशोधनासाठी वरदानरूप ठरला आहे.
बडोदा प्राच्यविद्या संस्थेचे तुलनात्मक वेगळेपण

 तत्कालीन भारताच्या विविध प्रांतात कार्यरत असणाऱ्या इतर १२ प्राच्यविद्यासंस्थांशी बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेची तुलना केली असता सयाजीरावांनी या संस्थेच्या माध्यमातून प्राच्यविद्या संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याचे वेगळेपण आपल्या लक्षात येते.

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ३२