पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव महाराजांनी त्यांना बडोद्याचे औद्योगिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. त्यावेळी व्हाईटनॅक यांचे वय अवघे ३० वर्षे होते. बडोद्यातील तत्कालीन ब्रिटिश रेसिडेंटने या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला. भविष्यात व्हाईटनॅक यांच्याकडून बडोद्याच्या राजकीय प्रकरणांमध्ये हस्तक्षेप होण्याच्या भीतीने ब्रिटिश रेसिडेंटने व्हाईटनॅक यांची कौटुंबिक आणि इतर पार्श्वभूमीची माहिती मागवली.
 परंतु नोव्हेंबर १९०६ मध्ये परदेश दौऱ्यावरून परतताना महाराज सयाजीराव व्हाईटनॅक यांना कोणतेही नियुक्तीचे पत्र देण्याआधीच आपल्याबरोबर बडोद्याला घेऊन आले. ब्रिटिश सरकारला कोणतीही कल्पना न देता सयाजीराव महाराजांनी बडोद्याच्या दिवाणांकरवी सहा महिने कालावधीसाठीचे नियुक्तिपत्र व्हाईटनॅक यांना दिले. बडोद्याचे तत्कालीन दिवाण आर. सी. दत्त यांनी २७ नोव्हेंबर १९०६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार व्हाईटनॅक यांची २५० डॉलर प्रतिमहिना वेतनावर 'Expert adviser in matters relating to the industrial development of the state' या पदावर नियुक्ती केली.
 नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर व्हाईटनॅक यांनी चार पानी पत्र लिहून स्वतःला आवश्यक बाबी दिवाणांना कळवल्या. या पत्रात बडोद्याची नोकरी स्वीकारण्यापाठीमागील भूमिका मांडताना ‘भारताचे खरे रूप समजून घेऊन मायदेशी परतताना भारत देश आणि भारतीय लोक यांच्याबद्दल पूर्वग्रहविरहित सत्य घेऊन

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १०