पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून देण्यात आली. व्हाईटनॅक यांनी तयार केलेल्या बँक ऑफ बडोदाच्या प्रस्तावाला १६ डिसेंबर १९०७ रोजी सयाजीराव महाराजांनी मंजुरी दिली. तत्पूर्वी महाराजांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवताना लिहिलेल्या पत्रात व्हाईटनॅक यांनी त्यांना अपेक्षित बँकेचे कार्य स्पष्ट केले आहे. या पत्रात व्हाईटनॅक लिहितात, “बँकेच्या स्थापनेसाठी बडोदा सरकारने निधी दिला असला तरी सरकारच्या आर्थिक व्यवहारासाठी सातत्याने कर्ज पुरवून मदत करणे हे तिचे मुख्य 'कार्य नाही. तर जनतेला त्यांच्या औद्योगिक व्यवहारांसाठी अर्थसाहाय्य करणे हेच बँकेचे प्रमुख कर्तव्य आहे." आजवरची बँक ऑफ बडोदाची वाटचाल विचारात घेता व्हाईटनॅक यांनी स्थापनेवेळी मांडलेला उद्देश सफल झाल्याचे दिसते.
 जनतेला बँकेचा उद्देश आणि उपयुक्तता समजावून सांगण्यासाठी अमेरिकन टाऊन हॉल मीटिंगच्या धर्तीवर सार्वजनिक सभेचे आयोजन करण्याची कल्पना व्हाईटनॅक यांनी मांडली. त्यानुसार १९ जुलै १९०८ रोजी सयाजीरावांच्या उपस्थितीत बडोद्यात ही सार्वजनिक सभा पार पडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २० जुलै १९०८ रोजी बडोदा कंपनी कायदा, १८९७ अंतर्गत बँक ऑफ बडोदाची नोंदणी करून औपचारिकपणे स्थापना करण्यात आली. बडोदा संस्थानाबरोबरच गुजरात, काठीयावाड आणि मुंबई प्रांतांमध्ये व्यवसाय करण्यास बँक ऑफ बडोदाला परवानगी देण्यात आली. यामध्ये बडोदा संस्थानातील जनतेला

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १२