पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भागभांडवलामध्ये प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली होती. बँकेच्या संचालक मंडळामध्ये बडोद्यातील नामांकित आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्ती, बडोदा सरकारचे महालेखापाल, राजघराण्याचे प्रतिनिधी संपतराव गायकवाड आणि व्हाईटनॅक यांचा समावेश होता. तर बँकेचे चेअरमन म्हणून विठ्ठलदास ठाकरसी यांची नियुक्ती करण्यात आली.
 स्थापनेनंतर ३ वर्षांतच सरकारच्या वतीने आर्थिक व्यवहार करण्याचे काम कोषागाराकडून बँक ऑफ बडोद्याकडे देण्यात आले. १५ जून १९१० पासून बँक ऑफ बडोदाला संस्थानी बँक (State Bank) म्हणून मान्यता देण्यात आली. व्हाईटनॅक यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदामध्ये खासगी भांडवल आणि सरकारी आश्रय यांचा सुंदर मेळ घालण्यात आला.
 बडोदा सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून व्हाईटनॅक यांच्या नियुक्तीचा कार्यकाल ३ सप्टेंबर १९०९ रोजी संपुष्टात आला. नोकरीतून मुक्त झालेले व्हाईटनॅक उच्चशिक्षणासाठी हार्वर्ड विद्यापीठात गेले. त्यानंतर त्यांनी पॅरिस, म्युनिच आणि जपानमधील टोकियो येथील विद्यापीठांमध्ये प्रत्येकी एक वर्ष उच्चशिक्षण घेतले. परंतु बडोद्याच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या व्हाईटनॅक यांनी २ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा १५०० रु. वेतनावर नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्यावेळी रिक्त असणाऱ्या शिक्षण खात्याच्या संचालकपदी व्हाईटनॅक यांची नियुक्ती करण्यास ब्रिटिश रेसिडंट सेल्डन आणि

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १३