पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थशास्त्राच्या (Macro Economics) विकासात क्रांतिकारक भूमिका बजावली. त्यांनी मांडलेल्या अर्थशास्त्रविषयक विचारातूनच अर्थशास्त्राच्या 'केनेशियन ज्ञानशाखे'चा जन्म झाला. बँक ऑफ इंग्लंडचे संचालकपद भूषवलेले जॉन केन्स २० व्या शतकातील सर्वांत प्रभावी अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. जॉन केन्स यांच्या संदर्भाने व्हाईटनॅक यांच्या बडोद्यातील नियुक्तीचे महत्त्व विशद करताना आनंद चंदावरकर लिहितात, " बडोद्याच्या आर्थिक सल्लागारपदी व्हाईटनॅक यांची झालेली नियुक्ती ही तत्कालीन भारतातील एकमेव घटना होती. १९१४ मध्ये जॉर्ज फिडले शिरस ( George Findlay Shirras) या अर्थशास्त्रज्ञाची भारताच्या सांख्यिकी विभागाच्या संचालक पदासाठी शिफारस करताना जॉन केन्स यांनी (सयाजीरावांनी उभारलेल्या) अशा प्रकारच्या व्यवस्थेचा विचारदेखील केला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे व्हाईटनॅक यांच्या बडोद्यातील नियुक्तीवेळी ब्रिटनकडे देखील आर्थिक सल्लागार नव्हता.” ही बाब सयाजीरावांच्या दूरदर्शी व्यवस्थापनाचा पुरावाच देते.
 पुढे १९२९ मध्ये जॉन केन्स यांनी ते स्वतः सदस्य असलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेत एकापेक्षा अधिक अर्थतज्ज्ञ व्यक्तींची नियुक्त करण्याचा सल्ला दिला. १९३५ मध्ये बी. के. मदन यांची पंजाब सरकारच्या आर्थिक सल्लागारपदी नेमणूक होईपर्यंत ब्रिटिश भारतातदेखील आर्थिक सल्लागार पद अस्तित्वात नव्हते. दोनच वर्षांनंतर १९३७ मध्ये लंडन स्कूल

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १६