पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिफारस या आयोगाने केली. या शिफारशीनुसार १८९९-१९०० मध्ये नवसारी येथे २ कृषी बँकांची स्थापना करण्यात आली. या कृषी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी बडोदा सरकारकडून अनेक सवलती देण्यात आल्या. तर स्थानिक पातळीवर स्थापना करण्यात आलेल्या खेतीवाडी पेढ्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे काही उत्साही अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. १९०५ मध्ये बडोदा सरकारने पारित केलेल्या सहकारी संस्था कायद्याने पतपुरवठा संस्थांच्या स्थापनेला गती मिळाली. पुढे १९१३ मधील अन्य एका कायद्याने बिगर पतपुरवठा सहकारी संस्थांना चालना मिळाली.
 बडोद्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योजकांना सुलभरीत्या पतपुरवठा करणे गरजेचे होते. हे ओळखूनच सयाजीरावांनी बडोद्यात बँक स्थापनेसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान बँक ऑफ मुंबईने बडोद्यात आपली शाखा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली. परंतु त्यांनी अवास्तव सवलतींची मागणी केल्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. या संधीचा लाभ उचलण्यासाठी मुंबईस्थित इंडियन स्पेसी बँकेने बडोद्यात शाखा उघडण्याची परवानगी मागितली. परंतु ही परवानगी मागताना बडोद्यातील शाखेतील पैसा अन्य कोणत्याही शाखेत वर्ग करण्याची सवलतदेखील बँकेने मागितली. या मागणीवर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २०