पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिनिधी) आणि भागधारकांनी निवडून दिलेले ४ अशा एकूण ७ सदस्यांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली. या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशींच्या संदर्भातील अंतिम निर्णय महाराजांवर सोपवण्यात आला.
 ३ फेब्रुवारी १९०७ रोजी व्हाईटनॅक यांनी हरिभक्ती नामक जनता प्रतिनिधींना पत्र लिहून बँकेच्या स्थापनेसाठी प्रस्ताव तयार करण्याची आज्ञा महाराजांनी केली असल्याचे कळवले. हा प्रस्ताव तयार करण्याच्या कामी बँकिंग तज्ज्ञांनी नियुक्त केलेल्या ४-५ प्रतिनिधींच्या समितीची मदत मिळावी अशी अपेक्षा व्हाईटनॅक यांनी या पत्रात व्यक्त केली होती. अन्य बँकेच्या शाखेपेक्षा संस्थानची स्वतंत्र स्वमालकीची बँक स्थापन करण्याच्या आग्रहामागील आपली भूमिका विशद करताना व्हाईटनॅक यांनी बँकिंग व्यवसायातील आर्थिक गणित सप्रमाण मांडले. त्यांच्या मते, बडोदा संस्थानची स्वतंत्र बँक नसल्यामुळे सरकार आणि जनता यांना आपला पैसा मुंबई, अहमदाबाद व इतर ठिकाणच्या बँकांमध्ये गुंतवावा लागे. अशा प्रकारे संस्थानाबाहेर गुंतवण्यात आलेली रक्कम १ कोटी ५० लाख रु. इतकी होती. बडोद्यातील उद्योगांना भांडवलाची कमतरता जाणवत असताना संस्थानातील हा पैसा बाहेरील उद्योगांच्या भरभराटीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. या पार्श्वभूमीवर बडोदा संस्थानने स्वतः ची बँक स्थापन केल्यास संस्थानात नवीन गुंतवणूक वाढण्याची आशा व्हाईटनॅक यांनी व्यक्त केली.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २२