पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर अखेर १६ डिसेंबर १९०७ रोजी सयाजीरावांनी या योजनेला मान्यता दिली.
 ७ मार्च १९०८ रोजी बँकेच्या तात्पुरत्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला व्हाईटनॅक आणि बडोद्यातील सावकारांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. सर्व बाबींवर चर्चा होऊन एकमत झाल्यानंतरच बँकेची नोंदणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विठ्ठलदास ठाकरसी, समल बेचार, मगन पुरुषोत्तमभाई, हरिभक्ती आणि चुनीलाल नागीनदास यांनी व्हाईटनॅक यांना बँकेच्या संचालकपदी नियुक्त करण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी महाराजांनी मान्य केली. जुलै १९०८ मध्ये बँकेच्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली. सुमारे दीड वर्षे चाललेली ही बँकेच्या स्थापनेसंदर्भातील सर्व चर्चा प्रामुख्याने संस्थानचे अधिकारी आणि बँक व्यावसायिक व बडोद्यातील सावकार यांच्यामध्येच झाली.
 सर्वसामान्य जनता या सर्व घडामोडींपासून पूर्णत: अनभिज्ञ होती. बँक यशस्वी होण्यासाठी जनतेला तिच्याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक होते. म्हणूनच जनतेला बँकेचे ध्येय, उद्दिष्टे आणि उपयुक्तता यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्याचे निश्चित ठरवण्यात आले. त्यानुसार बडोद्यात १९ जुलै १९०८ रोजी ही सार्वजनिक सभा पार पडली. या सभेला सर्वसामान्य जनतेबरोबरच बडोद्यातील नामवंत

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २८