पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावकार, अर्थतज्ज्ञ, उद्योगपती आणि संस्थानचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे बडोदा सरकारचा बँक स्थापनेस असणारा पाठिबा दर्शवण्याच्या उद्देशाने सयाजीराव महाराज स्वतः या सभेला उपस्थित राहिले.
 संस्थानाची आर्थिक स्थिती सक्षम असल्यामुळे सरकारला अशा प्रकारच्या बँकेची गरज नसली तरी जनतेच्या भल्यासाठी या बँकेची स्थापना केल्याची भूमिका सयाजीरावांनी या सभेत मांडली. बडोदा बँकेच्या स्थापनेमागची स्वतःची भूमिका आणि बँकेकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट करताना या सभेत सयाजीराव म्हणतात, “स्वतः सहकारी तत्त्वावर चालून नवीन संस्थानाही त्याच तत्त्वाचा वस्तुपाठ या बँकेने दिला पाहिजे आणि व्यापारविषयक व्यवहाराच्या आधुनिक पद्धती लोकांना शिकविण्याचे कामही या बँकेने सतत केले पाहिजे. मुंबईमध्ये स्वदेशी भांडवलावर नुकत्याच स्थापना झालेल्या दोन बँकांनी जे संपूर्ण यश संपादन केले आहे. त्यावरून निर्विवाद सिद्ध झाले आहे की, कोणत्याही देशातील हुशार बुद्धिवंताशी हिंदी अर्थशास्त्रज्ञ टक्कर देऊ शकतात. हिंदी लोकांतील काही जाती तर फार जुन्या काळापासून विविध सराफी व्यवहारांना एक उच्च कला म्हणून ओळखत आहेत. "
 याच सभेत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हेच स्वदेशीचे ध्येय असल्याचे स्पष्ट करताना महाराज म्हणतात, “औद्योगिक उन्नतीची पाश्चात्त्य तत्त्वे आपल्या देशाला लागू करणे हाच मला

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २९