पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांप्रत काळी किमान प्रतिकाराचा व म्हणून सोपा असा मार्ग दिसतो. यासाठी संघटित स्वरूपाने प्रयत्न करणे अवश्य आहे. तसा एक खासगी प्रयत्न बडोदे बँकेच्या रूपाने करण्यात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे."
 या सभेच्या आदल्या दिवशी १८ जुलै १९०८ रोजी सकाळी ११ वाजता सयाजीरावांनी हत्तीवरून बँक ऑफ बडोदाच्या कार्यालयात येऊन १०१ सोन्याची नाणी ठेव स्वरूपात बँकेत ठेवली. ही बँक ऑफ बडोदामधील पहिली ठेव होती. तर या सभेनंतर दुसऱ्या दिवशी २० जुलै १९०८ रोजी बडोदा कंपनी अॅक्ट, १८९७ अंतर्गत बँक ऑफ बडोदाची नोंदणी करण्यात आली. बडोद्याच्या मांडवी भागात बँकेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली. बँकेच्या माहितीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण गुजरात, काठीयावाड आणि मुंबई प्रांत हे तिचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले होते. बँकेच्या संचालक मंडळात व्हाईटनॅक, संपतराव गायकवाड, बडोद्याचे महालेखापाल यांच्यासह नामवंत सावकार आणि अर्थतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. विठ्ठलदास ठाकरसी यांची बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर चार्ल्स इ. रँडल यांची व्यवस्थापकपदी नेमणूक करण्यात आली. १ सप्टेंबर १९०८ रोजी चार्ल्स इ. रँडल आपल्या कार्यालयात रुजू झाले. १५ जून १९१० रोजी बँक ऑफ बडोदाला राज्य बँकेचा दर्जा देण्यात आला. याच वर्षी अहमदाबाद येथे बँकेची शाखा सुरू करण्यात आली.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३०