पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे बिल मागे घेतले. पुढे १९३४ मध्ये ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा संमत केला. १९३५ मध्ये लागू करण्यात आलेल्या Government Of India Act च्या १५३ व्या भागात रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठीच्या आवश्यक बाबींचे स्पष्टीकरण देण्यात आले. अखेर १ एप्रिल १९३५ पासून रिझर्व्ह बँकेच्या कामकाजास सुरुवात झाली.
 रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपासूनच तिच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश आणि बँकेची ध्येयधोरणे यावर भारतीय आर्थिक विश्वात सातत्याने चर्चा होत आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचे तत्कालिक कारण स्पष्ट करताना 'Modern Banking In India' या ग्रंथात सुमंत मुरंजन लिहितात, “भारताच्या आर्थिक आणि बँकिंग क्षेत्राची गरज हे रिझर्व्ह बँकेच्या तातडीच्या स्थापनेपाठीमागील मुख्य कारण नव्हते. ब्रिटिश भारताच्या तत्कालीन केंद्र सरकारमध्ये होऊ घातलेले बदल हे त्यामागील महत्त्वपूर्ण कारण होते. या बदलानुसार सरकारचे अर्थमंत्र्याकडील खाते विधिमंडळाला जबाबदार असणाऱ्या अन्य मंत्र्याकडे सोपवण्यात येणार होते.” रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागील भूमिका आणि बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेमागील सयाजीरावांचे तत्त्वज्ञान तुलनात्मक दृष्टीने समजून घेतल्यास आजही आपल्याला सयाजीरावांच्या धोरणांची गरज का आहे, या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे मिळते.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३२