पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि तामिळनाडू सेंट्रल बँक यांचा समावेश होता. १९ जुलै १९६९ रोजी केंद्र सरकारने १३ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राष्ट्रीयीकरण झालेल्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदाचादेखील समावेश होता. यावेळी राष्ट्रीयीकरण झालेल्या बँकांपैकी नफा कमावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये बँक ऑफ बडोदाचा समावेश होता. तर १९६९ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या ४३३ शाखा कार्यरत होत्या. यामध्ये २०९ ग्रामीण भागातील शाखांचा समावेश होता. ५ वर्षांतच १९७४ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखांची संख्या ८१७ पर्यंत पोहोचली. यापैकी ४८० शाखा ग्रामीण भागात कार्यरत होत्या.
 १९७६ मध्ये उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे बँक ऑफ बडोदाची पहिली ग्रामीण विभागीय शाखा सुरू करण्यात आली. १९८० मध्ये बँक ऑफ बडोदाची १० ग्रामीण विभागीय कार्यालये कार्यरत होती. १९८५ मध्ये बडोदा बँकेने क्रेडिट कार्डची सुविधा सुरू केली. नोव्हेंबर १९९७ मध्ये केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने स्वायत्त पॅकेजच्या अंमलबजावणीची घोषणा केली. या पॅकेजची अंमलबजावणी करणारी बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली. १९९९-२००० मध्ये बँक ऑफ बडोदाच्या एकूण २,६५२ शाखा कार्यरत होत्या. २००१ मध्ये भारतातील बँकेच्या ए. टी. एम. सुविधेचा विस्तार करण्यासाठी बडोदा बँकेने नवीन योजना आखली.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३५