पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 २००२ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विनंतीवरून देशभरात १०५ शाखा कार्यरत असणारी बनारस स्टेट बँक बडोदा बँकेत विलीन करण्यात आली. २००२ मध्ये गुजरातमधील धार्मिक दंगलग्रस्तांसाठी बडोदा बँकेने २ विशेष योजना सुरू केल्या. तर याच वर्षी दहशतवादी हल्ल्यात नुकसान झालेल्या अक्षरधाम मंदिराच्या डागडुजीसाठी बडोदा बँकेने १ लाख रु. ची देणगी दिली. स्थापनेनंतर ९४ वर्षांनीदेखील बँक ऑफ बडोदाने ‘सयाजीविचार’ जपल्याचा हा पुरावा आहे. २००५ मध्ये बँकेने आपल्या लोगोमध्ये बदल करून नवीन लोगो स्वीकारला. २१ देशातील २८०० ठिकाणी एकाचवेळी या लोगोचे उद्घाटन करण्यात आले.
 'सयाजीमार्गाने वाटचाल करत यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करणारी बँक ऑफ बडोदा समाजाच्या विकासातील आपली जबाबदारी तितक्याच सक्षमपणे पार पाडत आहे. भारतातील बेरोजगार तरुणांना उद्योगविषयक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी बँक ऑफ बडोदा देशभरात ६४ प्रशिक्षण केंद्रे चालवते. ३१ मार्च २०२० पर्यंत या केंद्रांच्या माध्यमातून ५,०३,१४५ भारतीय तरुणांना उद्योगविषयक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीतील ८५,६८५, अनुसूचित जमातीतील १,११,२९६, अल्पसंख्याक समाजातील ४२,६४५ आणि इतर मागास वर्गातील १,५७,२३१ तरुणांचा समावेश होता. आजही ही बँक सयाजीरावांच्या सर्वसमावेशक

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३६