पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केंद्र सरकार आणि तिन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी २ जानेवारी २०१९ रोजी परवानगी दिली. त्यानुसार १ एप्रिल २०१९ रोजी दोन्ही बँका बडोदा बँकेत विलीन करण्यात आल्या. या विलिनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एच.डी.एफ.सी. बँकेनंतर भारतातील तिसरी सर्वांत मोठी बँक ठरली.
 स्वातंत्र्यपूर्व भारतातील विविध संस्थानांच्या बँकांचा तुलनात्मक आढावा घेताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेले १९५१-१९६७ या कालावधीतील अहवाल उपयुक्त ठरतात. मार्च १९५२ मध्ये भारतात ५४ संस्थानांच्या बँका कार्यरत होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या सर्व बँका भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या १९५९-१९६७ कालावधीतील अहवालात काही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. हा अहवाल सांगतो, “स्वातंत्र्यापूर्वी या संस्थांमध्ये संस्थानांच्या राज्यकर्त्यांचे जे हितसंबंध गुंतले होते तेच हितसंबंध बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारतातील राज्यांचे गुंतले आहेत. आकारमानानुसार विचार करता संस्थानांच्या बँकांमध्ये प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ, समकालीन संस्थानांच्या बँकांपैकी सर्वांत मोठी बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाकडे करोडो रुपयांच्या ठेवी आहेत. तर दुसऱ्या बाजूला बँक ऑफ बरवानीकडे असणाऱ्या एकूण ठेवींची रक्कम ३,००० रु. भरते.”

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ४४