पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याशिवाय लक्ष्मीविलास राजवाड्याच्या मुख्य पोर्चमध्ये पाणी वाहणारा भिस्ती, नाचणारी बाई, दोन चित्ते व त्यांना पाळणारे रक्षक, सारंगीवाला व एक संन्याशी यांचे पुतळे भर आकाराचे उभे ठेवले आहेत. मुख्य दरबारच्या दिवाणखान्यात या राज्यातील पूर्वीचे दिवाण काजी शहाबुद्दीन, लक्ष्मण जगन्नाथ व मणिभाई जसभाई यांचे अर्धपुतळे ठेवले आहेत. त्याचप्रमाणे बयाबाईसाहेब घाटगे व बाजीरावसाहेब घाटगे यांचे अर्धपुतळेही त्याच कुसरीचे आहेत. पण या सर्वापेक्षा फेलिसीचा सर्वात सुंदर पुतळा म्हणजे 'हातात बंदूक घेतलेला अरब शिकारी' याचा होय. तो मुख्य जिन्याच्या कठड्यावर उभा केला आहे. तो कलेच्या दृष्टीने फारच सुंदर साधला आहे. या सर्व पुतळ्यांबरोबर लक्ष्मी विलास पॅलेसच्या हिरवळीवरदेखील परदेशातून आणलेली अनेक आकर्षक शिल्पे ठेवण्यात आलेली आहेत. लक्ष्मीविलास राजवाड्यासमोरील संगमरवरी मयूर शिल्प, इजिप्तचा मदर स्टॅच्यू, हत्तींच्या जोडीचा पुतळा अशी अनेक शिल्पे पर्यटकांचा विशेष आकर्षणबिंदू ठरतात.
राजवाड्याचे बाह्यरूप

 राजवाडा बाहेरून संपूर्ण दगडी बांधकाम करून बांधला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आतील भाग उष्णतेने गरम होऊ नये म्हणून पुढील भागास व मागील बाजूस असंख्य कलात्मक मोठमोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. राजवाड्याच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळी असून, त्यावर अगदी छोटे सज्जे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १४