पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. ही जाळी बघताना आग्रा येथील ताजमहालाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तिथे खिडक्या असून त्यावर उत्कृष्ट दगडी कोरीवकाम केलेले दिसते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन उंच मनोरे व त्याला असलेल्या चौफेर बालकन्या (Balconies ) तर प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. मध्यभागी असलेल्या अर्धगोलाकृती घुमटाच्या टोकावर मध्यभागी असलेला काठीवरील डोलणारा भगवा झेंडा गायकवाड सरकार राजमहालात हजर असल्याची साक्ष देतो. राजवाड्याभोवती सुंदर बगिचा असून, मध्यभागी बरेच मोठे कारंजे आहेत. सगळा बगिचा सुंदर फुलांनी सुशोभित केला असून, ठरावीक अंतरावर संगमरवराच्या बसण्याकरिता बैठकी आहेत. हा विस्तीर्ण बगिचा मि. गोल्डरिंग यांनी बनविला होता. या बागेत फेलीसी या शिल्पकाराने तयार केलेली अनेक पुतळे आणि शिल्पे अतिशय कलात्मकतेने बसविण्यात आली आहेत.

 एकूण राजवाडा आतून किती भव्य आणि कलासंपन्न असेल याची मुख्य प्रवेशद्वारावरून कल्पना येते. पूर्वी सकाळ- संध्याकाळ या प्रवेशद्वारावर सनईचौघडांचे मंजूळ स्वर ऐकू येत असत. राजदरबाराचे मुख्य चार भाग आहेत. पहिला भाग राजदरबाराकरिता असून, दरबाराच्या लोकांना आत जाण्यासाठीचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे. दरबार हॉलची लांबी ९४ फूट व रुंदी ५४ फूट आहे. संपूर्ण राजवाडा दोन मजल्यांचा आहे, पूर्वेकडील बाजू ही सिंहासनाकरिता आहे. चर्चमध्ये जशा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १५