पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विलास पॅलेस हा भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारा झाला आहे, याचे आम्हाला समाधान आहे. आर्किटेक्ट्सने पॅलेसच्या बांधकामातील शिखर स्थानाच्या रचना अनुक्रमे हिंदू, शीख, मुस्लिम आणि ख्रिस्ती वास्तुकलेच्या प्रतीकांना अनुसरून केली आहे."
अस्पृश्यांचा सन्मान करणारा राजवाडा

 १६ मार्च १९०५ ला राजपुत्र धैर्यशीलराव आणि इतर सात मुलांची मुंज लक्ष्मीविलास राजवाड्यात झाली. २३ जानेवारी १९१० रोजी सयाजीरावांनी बडोद्यातील सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना राजवाड्यात मोठी मेजवानी दिली. १९११-१२ मध्ये अनाथ आश्रमातील ५ किंवा ६ मुलींना संगीत शिक्षणासाठी राजवाड्यावर पाठविण्यात यावे असा महाराजांनी हुकूम केला. १९१२ मध्येच सयाजीरावांनी अस्पृश्यांच्या सर्व मुलांना लक्ष्मीविलास राजवाड्यात जमवून खाऊ वाटला होता. यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांनी हा प्रकार आवडल्यामुळे एक हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी दिले. १९२५ मध्ये सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्यात सर्व जातीयांसाठी सहभोजनाचे आयोजन केले होते. सयाजीरावांनी वेगवेगळ्या प्रांतातील व जातीधर्मांचे पदार्थ राजवाड्यात बनवले जावेत यासाठी मुसलमान, पारसी, मद्रासी, हिंदुस्थानी आणि फ्रेंच इ. स्वयंपाकी राजवाड्यातील स्वयंपाकघरात नेमले होते. सामाजिक समन्वयाचा प्रयोग या

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १८