पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वयंपाक्यांच्या माध्यमातून सयाजीरावांनी स्वत:च्या स्वयंपाक घरापासून आरंभिला होता.
महाराजांचे दातृत्व

 महाराज म्हणजे ऐश्वर्य, काटकसर आणि दातृत्व यांचा अतिशय दुर्मिळ आणि क्रांतिकारक 'संगम' होते. महाराजांचे ऐश्वर्य जसे नजरेत भरणारे होते तसेच कुटुंबापासून ते राज्याच्या प्रशासनापर्यंत त्यांनी केलेल्या काटकसरीचे प्रयत्न आज विश्वास बसणार नाही इतके मूलभूत होते. या सगळ्याचा कळस म्हणजे महाराजांचे दातृत्व होय. बडोदा संस्थानचे प्रशासकीय अहवाल पाहिल्यानंतर संस्थानच्या उत्पन्नापैकी सरासरी १५% रक्कम विविध बांधकामावर खर्च केली जात असल्याचे दिसून येते. यामध्ये रस्ते, पाटबंधारे तसेच इतर लोकोपयोगी वास्तूंचा समावेश केला जात होता. शिक्षण संस्थांच्यासाठीदेखील अधिकाधिक खर्च महाराज करत होते. महाराजांनी काही ठळक वास्तू व संस्थांच्या इमारतीवर केलेला खर्च उदाहरणादाखल देत आहे. कंसात दिलेले आकडे लाखात दिले आहेत. फिमेल ट्रेनिंग कॉलेज (०.९), मिडल स्कूल (१.४), म्युझियम (२.६), बडोदा हायस्कूल (२.८), कीर्तीमंदिर (४.१), कलाभवन (५.५), न्यायमंदिर (७.३), बडोदा कॉलेज (८.३), मकरपुरा राजवाडा ( १२.८), प्रतापविलास (१२.०), सार्वजनिक बाग (१९.२), ड्रेनेज काम (२५.०), वॉटर वर्क्स (४३.०) आणि लक्ष्मीविलास राजवाडा (५२.२) इ.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १९