पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भव्य अशी सायन्स इन्स्टिट्यूटची इमारत आहे. त्यानंतर बडोदे कॉलेजची डौलदार भव्य इमारत दृष्टीस पडते. मधे सयाजीराव टॉवर व उजव्या बाजूस दूर जाणारा असा सयाजीगंज रस्ता आहे. त्याच्या टोकाशी असलेली 'अमीन निवास' या नावाची इमारत, असा हा टापू आहे. कॉलेजनंतर महाराजांचा अश्वारुढ पुतळा, काळा घोडा लागतो. पूल ओलांडल्यानंतर राजघराण्यातील राजपुरूषांच्या छब्या, भव्य कीर्तिमंदिर, तसेच इस्पितळाच्या इमारती नगरशृंगाराची साक्ष देतात.” (तळवलकर वासुदेव, १९१८, गौरवगाथा, पान नं. २२५, २२६, २२७)
 तळवळकरांनी वर्णन केलेल्या नवीन बडोद्यातील प्रेक्षणीय स्थळांविषयी वाचल्यावर आपण स्वप्नातल्या सुंदर आखीव रेखीव नगरीतून सैर करत आहोत, असा भास झाल्याशिवाय राहत नाही. बडोदा ही कल्पकतेने नटलेल्या सुंदर वास्तूंची केवळ स्वप्ननगरी नसून विविध शैलीतल्या स्थापत्यकलांचा वापर करून सजवलेली अद्भुत नगरी आहे. येथील प्रत्येक वास्तूला सयाजीरावांच्या कल्पकतेचा स्पर्श झालेला दिसून येतो. कोठी कचेरी ही महाराजांच्या विविध कार्यालयासाठी उभारलेली भव्य इमारत आहे. ही इमारत विलायतेतील १९०० शतकातल्या इमारतीत शोभून दिसेल इतकी साधर्म्य असलेली आहे. महाराजांनी नगरविस्तार करताना लोकांची योग्य सोय, कलेची दृष्टी, स्थापत्यशास्त्राचे पुनरूज्जीवन, जुन्या कलेची जोपासना इत्यादी घटक नेहमीच नजरेसमोर ठेवले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १२