पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार'. या सुभाषिताप्रमाणे महाराजांनी आयुष्यभर देशात तसेच परदेशात अनेकदा प्रवास केला. युरोपमधील लंडन, पॅरिस, रोम वगैरे ठिकाणी ते बरेचदा गेले. ही शहरं वास्तुकलेसाठी जगप्रसिध्द आहेत. भव्य कलाकुसरीने सजलेल्या प्राचीन इमारती, चर्च, सार्वजनिक सभास्थळे ही या शहरांची आकर्षण आहेत. अप्रतिम शिल्पकलेत न्हालेल्या इथल्या प्राचीन इमारतींचा सयाजीरावांवर परीणाम झाला नाही तर नवल! महाराजांच्या आवडी निवडींना योग्य दिशा मिळण्यास ही देशाटनं खूप उपयोगी पडलेली दिसतात. सयाजीरावांची सुक्ष्म निरीक्षण करण्याची वृत्ती आणि जे जे उत्तम आहे ते सर्व आपल्या राज्यात आणण्याची धडपड याची साक्ष त्यांनी बडोद्यात उभारलेल्या भव्य दिव्य इमारतींवरून येते. लक्ष्मीविलास पॅलेस, प्रतापविलास पॅलेस, इंदुमती पॅलेस, राजमहालातले मोझॅकचे काम, मकरपुरा राजवाड्यातील बाग, कॉलेजची इमारत, कीर्तिमंदिर, बडोदा म्युझियम आणि पिक्चर गॅलरी, न्यायमंदिर, चिमणाबाई क्लब, ज्युबिली पार्क, सार्वजनिक बाग, मेल-फिमेल ट्रेनिंग सेंटर, मकरपुरा राजवाडा, कलाभवन, सायन्स इन्स्टिट्यूट, सेंट्रल लायब्ररी, बडोदे हायस्कूल इ. बडोद्यातील या इमारती म्हणजे पाश्चात्य आणि भारतीय वास्तुकलेच्या मिश्रसंस्कृतीचा उत्तम नमूना होय.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १३