पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील या अनेक वास्तू सर्वोत्तम स्थापत्यकलेच्या सिद्धांतावर आजही उभ्या आहेत. चांगल्या इमारतींची व्याख्या ही तिच्या प्रमाणबध्द मांडणी, समतोलपणा, वास्तूचे प्रथमदर्शनी भाग आकर्षक (Focal point), योग्य मोजमाप, इमारतीची आकर्षक बाहेरील बाजू, छाया, प्रकाश आणि हवा खेळती राहण्याचे नियोजन, कारागिरांची शिल्पकलेतली कुशलता, इमारती अवतीभोवतीची मोकळी हवेशीर जागा, इमारत दुरून दिसण्यासाठी इमारतीचा उंच भाग यावर अवलंबून असते. बडोद्यातील सगळ्याच इमारती वास्तुकलेच्या या व्याख्येत बसणाऱ्या असून, महाराजांनी बांधकाम खात्यात स्वतः जातीने लक्ष दिल्याचा पुरावाच आहेत. बडोद्यातील बहुसंख्य इमारतींचे श्रेय आर्टिटेक्ट चार्ल्स मॉट आणि आर्किटेक्ट रॉबर्ट चिझम यांना दिले जाते.
बडोद्यातील राजवाडे आणि इतर इमारती
 बडोदा शहराच्या मध्यभागी सरकारवाडा म्हणून ओळखला जाणारा राजवाडा आजही अस्तित्वात आहे. इ.स. १८७५ मध्ये या राजवाड्यात राजकुटुंब राहत होते. हा राजवाडा खूप मोठा असला तरी त्यात खेळती हवा आणि प्रकाश येण्याची सोय नाही. अरूंद आणि अवघड जिने, प्रशस्त पण उपयोगात न आणता येणारी मोठाली दालने असा हा राजवाडा एकूणच राहण्यास योग्य नसल्याने त्याच्या शेजारीच नवीन नजरबाग राजवाडा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १४