पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मल्हारराव गायकवाडांनी बांधला होता. पण त्या राजवाड्यात राहणेही राजमंडळीस पटेना म्हणून मकरपुऱ्यास असलेला राजवाडा त्यावेळच्या रेसिडेंट आणि दिवाणांना राहण्यास दिला; येण्याजाण्यास दूर असल्याने तेथेही गैरसोय होत असे. मोतीबागेतला बंगला लहानखाणी होता; तोही एवढ्या मोठ्या राजकुटुंबाला पुरणार नसल्याने शहराजवळ हवेशीर ठिकाणी नवा राजवाडा बांधण्याचे ठरले. हाच तो 'लक्ष्मीविलास पॅलेस'.
१. लक्ष्मीविलास पॅलेस (१८९०)
 महाराजा सयाजीरावांनी स्वतःच्या कारकीर्दित बडोदे राज्यात तज्ञांच्या मदतीने नवनवीन वास्तूंचे आराखडे तयार करून बांधकाम सुरू केले. सयाजीरावांनी १८९० मध्ये मुख्य गावापासून दूर भव्य राजवाडा बांधला. जो आजही “लक्ष्मीविलास पॅलेस” या नावाने जगप्रसिध्द असून बडोद्याची शान वाढवत आहे. या पॅलेसचे डिझाईन मेजर चार्ल्स मॉन्ट या इंग्रज इंजिनियरला सोपविण्यात आले होते. त्यांनी या राजवाड्याचे डिझाईन इन्डो-सॅरसेनिक (Indo- Carasenic) या स्थापत्याच्या शैलीवर तयार केले आहे; परंतु बांधकाम चालू झाल्यावर ते प्लिन्थलेवलपेक्षा सहा-सात फूटवर आल्यावर एक अघटीत प्रसंग घडला, मेजर मॉन्ट यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जागी बडोद्याचे इंजिनियर रॉबर्ट चिस्लो यांना राडवाड्याचे पुढील काम सोपविण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १५