पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाल दिवा दिसायचा. मुख्य प्रवेशद्वारावरून राजवाडा आतून किती भव्य आणि कलासंपन्न असेल याची कल्पना करता येते. पूर्वी सकाळ संध्याकाळ या प्रवेशद्वारावर सनईचौघडांचे मंजूळ स्वर ऐकू येत असत.
 राजवाड्याची उत्तर दक्षिण लांबी ५१२ फूट असून पूर्व पश्चिम रुंदी २०० फूट आहे. राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची अंदाजे २०४ फूट आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ६०,००० स्क्वेअर फूट आहे. राजदरबाराचे मुख्य चार भाग आहेत. त्यातील पहिला भाग राजदरबाराकरिता असून दरबाराच्या लोकांना आत जाण्यासाठीचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे. दरबार हॉलची लांबी ९४ फूट व रुंदी ५४ फूट आहे. संपूर्ण राजवाडा दोन मजल्यांचा आहे. पहिल्या मजल्यावर तिन्ही बाजूस राजदरबारातल्या महिलांकरीता लाकडी झरोके ठेवण्यात आले आहेत. पूर्वेकडील बाजू ही सिंहासनाकरिता आहे. युरोपात चर्चमध्ये जशा उंच उंच खिडक्यांना रंगीत काचा लावलेल्या असतात तशाच रंगीत काचा दरबार हॉलच्या पूर्वेकडील खिडक्यांवर पहावयास मिळतात. दरबार हॉलच्या भिंतींना संगमरवरीसारखे गुळगुळीत प्लास्टर, राजवैभवास साजेसे मोझॅकचे काम, सोनेरी वर्खाने सुशोभित केलेले छतावरचे काम आणि राजा रवी वर्मांच्या पौराणिक रंगीत पेंटींगमुळे हा दरबार हॉल भारतीय प्राचीन संस्कृतीच्या राजवैभवाने आकर्षित करतो.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १८