पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राजवाड्याच्या दक्षिण भागात मध्यभागी एक कारंज्याचा चौक आहे. बहुतेकदा महाराजांचे वास्तव्य या भागातच असे. वरच्या मजल्यावर भव्य ग्रंथसंग्रहालय, डायनिंग हॉल, दिवसा राहण्यासाठी खासगी दालने असून दुसऱ्या मजल्यावर शयनागार आणि राजपाहुण्यांची दालने आहेत. महाराजांच्या विभागाच्या दक्षिणेस महाराणी चिमणाबाईंचे निवासस्थान होते. त्याचे प्रवेशद्वार स्वतंत्र ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना स्वतंत्र दिवाणखानाही होता. तो लक्ष्मीविलास पॅलेसचा चौथा मुख्य भाग होय. तसेच दवाखाना, जामदारखाना, बिलियर्ड रूम, गादी महल हे राजवाड्याच्या पूर्व भागात होते.
 संपूर्ण राजवाड्याचे बाहेरून बांधकाम दगडी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आतील भाग उष्णतेने गरम होऊ नये म्हणून पुढील बाजूस व मागील बाजूस असंख्य कलात्मक मोठ-मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत. उत्तर व पश्चिम भाग नक्षीकामाच्या कलाकुसरीने सुशोभित केला आहे. राजवाड्याभोवती सुंदर बगीचा असून मध्यभागी बरेच कारंजे आहेत. सगळा बगिचा सुंदर फुलांनी सुशोभित केला असून, , बसण्याकरिता ठराविक अंतरावर संगमरवराच्या बैठकी आहेत. हा विस्तीर्ण बगिचा मि. गोल्डरिंग यांनी बनविला होता. तसेच ब्राँझ धातूचे काही उत्कृष्ट शिल्पसुध्दा जागोजागी ठेवण्यात आले आहेत. या वास्तूच्या प्रवेश सोहळ्यासाठी मुंबईचे गव्हर्नर हजर होते. दिवाण सर टी. माधवराव या राजवाड्याचा शिल्पपध्दतीचे वर्णन करताना

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / १९