पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात, “या राजवाड्याची शिल्परचनापध्दत हिंदुस्थानी अथवा 'इंडो सॅरसेनिक' असून, ती आपल्या परंपरेला अनुसरून केली आहे. हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजातील शिल्पपध्दतीचा मिलाप तिच्यात पहावयास मिळतो. इकडील हवामानाप्रमाणे व हिंदू रिवाजांप्रमाणे सुखसोयींची तजवीज करून याची रचना करण्यात आली आहे. या राजवाड्यासाठी लागणारा दगड सोनगडच्या खाणींतून काढण्यात आला होता. राजवाड्यातील मुख्य दरबारचा दिवाणखाना फार भव्य व प्रशस्त असून त्याची लांबी ९३ फूट व रुंदी ५४ फूट असूनही त्यामध्ये एकही खांब नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या राजवाड्याची बांधणी उत्तर हिंदूस्थानातील शिल्पशास्त्राच्या धर्तीवर आहे. प्रख्यात शिल्पशास्त्रज्ञ व लेखक सर जेम्स फर्ग्युसन या पध्दतीस "आर्य भारती" (Indo-Aryan ), सांप्रताय म्हणून संबोधितात आणि पुष्कळ अंशी राजवाडा पाहून जाणाऱ्या मंडळींना तसेच वाटते.” हा पॅलेस बंकिंग हॅम पॅलेस च्या चार पट आकारात बनलेला खाजगी निवास स्थान म्हणून ओळखला जातो.
 अशा प्रकारे लक्ष्मीविलास पॅलेस आजही त्याच दिमाखात उभा असून पर्यटकांना आपल्या उंच मनोऱ्याच्या पसरलेल्या बाहूंनी आकर्षित करत आहे. अशा या भव्य राजवाड्यात १० फेब्रुवारी १८९० ला महाराज राजकुटुंबासह राहण्यास गेले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २०