पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजांनी इ.स. १८८० च्या दशकात महाराणी चिमणाबाईंच्या स्मरणार्थ एक महल बांधला होता राजकन्या इंदिराराजे यांच्या जन्मानंतर हा पॅलेस 'इंदूमती पॅलेस' या नावाने ओळखला जाऊ लागला. हा महल लक्ष्मीविलास पॅलेसच्या अगदी समोर बांधण्यात आला होता. या पॅलेसचा उपयोग राजकुटुंबाचे फोटोग्राफ्स आणि ऐतिहासिक पुस्तके ठेवण्यासाठी केला जाऊ लागला. लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये राहायला जाण्याआधी इंदूमती पॅलेसमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जात असे. हा पॅलेस म्हणजे मराठा पद्धतीचा वाडा, मुघल आणि देशी पध्दतीचा सुरेख मिलाप असलेला वास्तुकलेचा नमुना आहे. या पॅलेसच्या कंपाऊंडमध्ये अशोक बंगला आणि बकूळ बंगला असे दोन बंगले होते. पण काही काळापूर्वी ते नष्ट करण्यात आले आहेत.
 युवराज शिवाजीराव उत्तम क्रिकेट खेळत असत. त्यांच्यासाठी १९३६ मध्ये शिवमहल पॅलेस बांधण्यात आला. परंतु वयाच्या २९ व्या वर्षी आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र उदयसिंह गायकवाड या शिवमहल पॅलेसॅध्ये राहू लागले. लक्ष्मीविलास पॅलेसच्या हिरवळीवर मोतीबाग नावाचा छोटेखानी बंगला आहे. हा मोतीबाग बंगला लक्ष्मीविलास पॅलेसचे बांधकाम चालू असताना ब्रिटिश आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स लोकांचे राहण्याचे ठिकाण होते. सध्या तेथे गायकवाड बडोदा गोल्फ क्लब हाऊस आहे. हा छोटेखानी बंगला सुध्दा कल्पकतेने बांधलेला आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २४