पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याशिवाय महाराजांनी उटकमंडला (आताची उटी) वुड स्टॉक बंगला बांधला होता. याच्या जोडीलाच 'जयसिंग व्हिला' हा छोटा बंगला बांधला. या बंगल्याभोवती सुंदर बाग केली होती. या बंगल्याच्या रचनेसंबधी त्यांनी आपली कल्पकता वापरली होती. त्यांनी आर्किटेक्टला पत्र लिहून उटीचे घर कसे हवे आहे ते कळविले होते. या पत्रातून महाराजांची वास्तूबद्दल असणारी कलाभिरूची दिसून येते. तसेच मुंबईच्या मलबार हिलवरील ‘जयमहाल पॅलेस' ही प्रसिध्द इमारत महाराजांचे मुंबई वास्तव्यादरम्यानचे निवासस्थान होते.
 बडोदा शहारात राजवाड्यांव्यतिरिक्त वास्तुकलांचे अनेक उत्कृष्ट नमुने आहेत. जगभरातल्या वास्तुकलाप्रेमींना आजही ते आकर्षित करतात. जगभरातून या शास्त्राचे अनेक विद्यार्थी, या अनोख्या देशी- मुस्लिम पध्दत आणि युरोपियन शिल्पकलेच्या मिश्रणातून परीणाम साधलेल्या इंडो-सॅरसेनिक शैलीचा अभ्यास करण्यासाठी येतात. भारतीय हस्तकला आणि समृध्द परंपरेला या वास्तुकलेत प्राधान्य दिले आहे. जुन्या बडोद्यात अशी बरीच उदाहरणे सापडतात. जुन्या बडोदा शहराचे चार दरवाजे, मांडवी क्षेत्र, सार्वजनिक पुतळे, सार्वजनिक इमारती, संग्रहालय, कचेरी, न्याय मंदिर, हॉस्पिटल, महाविद्यालय ही या शहराला वास्तुकलेच्या दृष्टीने वरदान मिळालेली उदाहरणे आहेत.
 महाराजा सयाजीरावांच्या कारकीर्दीतील वास्तुकलेचे उत्तम नमुने असलेल्या काही इमारती पुढे देत आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २५