पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यावर पाश्चात्य शिल्पशास्त्रज्ञांनी प्रथमत:च बांधला होता. त्यामुळे त्यावेळेस मुसलमानी घुमट शैलीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. म्हणून वास्तुकलेत या इमारतीचे महत्व वाढले होते.
 आशिया खंडातील भव्य घुमटांमध्ये विजापूरच्या गोल घुमटानंतर या वास्तूच्या घुमटाचा क्रमांक लागतो. कॉलेजच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर मि. चिझम विलायतेस परत गेले. तेथे त्यांनी 'Royal Institute Of British Architects' या सभेपुढे घुमट व त्याची शास्त्रीय बांधणी या विषयावर एक निबंध वाचला होता. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने बडोदा कॉलेजच्या घुमटाचे वर्णन केले होते. या छोट्या महाविद्यालयाचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर होऊन आज ही संस्था 'The Maharaja Sayajirao University Of Baroda' या नावाने जगप्रसिध्द झाली आहे. हे असे एकमेव विद्यापीठ होते जिथे मातृभाषा आणि आंग्लभाषा ही शिक्षणाची माध्यमे होती.
६. सयाजीबाग (कामटी बाग) (१८७९)
 ८ जानेवारी १८७९ ला महाराजांनी उद्घाटन केलेल्या या बागेचा विस्तार सुमारे ११३ एकर आहे. या बागेची रचना विश्वामित्री नदीच्या रम्य काठी करण्यात आली आहे. नदीच्या किनारी असल्यामुळे उन्हाळ्यातही थंड वारे बागेला उल्हासित ठेवतात. या बागेतले पुतळे, लांबच लांब रस्ते, दुतर्फा वाढलेली झाडे, उंचच उंच वृक्ष, नदीवरचा झुलता पूल आणि सर्व प्रकारचे'मातृभाषा आणि

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २७