पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. कारागृहाचा बाह्य तट चतुष्कोणी असून चारही कोपऱ्यांवर व मध्यभागी रक्षकाकरिता मनोरे बांधण्यात आले आहेत. पूर्वाभिमुख तटाच्या मध्यभागी प्रवेशव्दार असल्याने तेथे पहाऱ्यासाठी मनोरे नाहीत. तटाच्या आत रूग्णालय, बंदिवासास धंदेशिक्षण देण्याचा वर्ग व कार्यालय वगैरे सोयी करण्यात आल्या आहेत. तटाबाहेर अधिकारी वर्गासाठी निवासस्थाने असून सभोवती कृषीकर्मासाठी विस्तृत आवार आहे.
 मध्यवर्ती कारागृहात न्यायप्रविष्ट कैद्याकरता (undertrial prisoners) स्वतंत्र गृह असून त्यांचा गुन्हेगारांशी संबंध येणार नाही असा बंदोबस्त करण्यात आला आहे. येथे विशिष्ट प्रकारचे व उत्तम वर्तणुकीचे गुन्हेगार ठेवण्यात येत असत. १६ ते २१ वर्षाच्या आतील गुन्हेगारांची सोयही येथेच करण्यात येत असे. या कारागृहात उत्तम गालिचे, सतरंज्या, वेतकाम, सुती व रेशमी कापड वगैरे जिन्नस तयार होतात. तसेच तटाबाहेरच्या भागात बागाईत करण्यात येते. बंदिवासीयांची मने सुसंस्कृत व्हावी व त्यांची स्थिती सुधारावी या उच्च हेतूने नीती व सदवर्तन या विषयांवर आठवड्यातून एक दिवस बोधपर उपदेश करण्यात येत असल्याचे १८८३-८४ च्या वार्षिक अहवालावरून दिसून येते. बडोद्यानंतर नवसारी, अमरेली, मेहसाणा, द्वारका वगैरे ठिकाणीही कारागृहे बांधण्यात आली आहेत. (तळवलकर वासुदेव, १९१८, गौरवगाथा, पान नं. २३१-३२)

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३०