पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ला त्याचे संगीत महाविद्यालयात रुपांतर करण्यात आले. या महाविद्यालयाचे प्राचार्य उस्ताद मौलाबक्ष खाँसाहेब हे होते. हे महाविद्यालय सूरसागर तलावाजवळ आहे. आजही ते उत्तमरित्या चालू आहे.
 या इमारतीचे काम विल्यम इमरसन (William Emerson) यांनी पाहिले होते. या संगीत महाविद्यालयात गायन, वादन आणि नृत्य यांचे शास्त्रीय शिक्षण दिले जाई. या ठिकाणी जगभरातून विद्यार्थी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी येतात. बरेच प्रसिध्द कलावंत या संगीत विद्यालयात माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य म्हणून काम करून गेलेले आहेत. उस्ताद मौलाबक्ष खाँ, उस्ताद फैयाझ खाँ, उस्ताद अब्दुल करीम खाँ, उस्ताद अत्ता हुसैन खाँ, उस्ताद सादीकी हुसैन खाँ, उस्ताद नसर हुसैन खाँ, उस्ताद हजरत इनायत खाँ, गायनाचार्य पंडित मधुसुदन जोशी, पंडित विष्णू नारायण भातखंडे, ही काही संगीत विश्वातली अजरामर नावे आहेत. ही सर्व तज्ञमंडळी एकेकाळी बडोद्यातल्या या संगीत शाळेशी जोडले गेलेले होते.
 महाराजांनी संगीतशास्त्राचा अभ्यासक्रम नव्याने व्यवस्थित तयार करण्यासाठी पंडित विष्णू नारायण भातखंडेंना या संगीत महाविद्यालयात निमंत्रीत केले होते. त्यांनी या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात बरेच बदल करून नोटेशनची पुस्तके तयार करून दिली होती. महालिद्यालयाची इमारत वास्तुकलेतला एक उत्तम नमुना म्हणून सर्वश्रुत आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३२