पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालल्या नंतर इ.स. १८९२ मध्ये महाराजांनी राजवाड्याची ही इमारत या संस्थेला भेट दिली ही इमारत प्रत्यक्षात एक महल होती अशाच काही नोंदी सापडतात. इ.स. १८९२ मध्ये ही इमारत संस्थेचे प्राचार्य टी. के. गज्जर यांचे विनंती वरून संस्थेस देण्यात आली. भारताच्या इतिहासात अनेक क्षेत्रांतील एकापेक्षा एक असे मौल्यवान हिरे निर्माण केले. सयाजीरावांची कलाभवनची ही संकल्पना काळाच्या किती पुढे होती याचे आज आपण साक्षीदार आहोत. तंत्रज्ञान युगाच्या अगदी प्रारंभीच्या काळात कलाभवन उभारले गेल्यामुळे भारताच्या प्रगतीच्या इतिहासात कलाभवनचे महत्त्व असाधरण आहे. कलाभवन हे जर्मनीच्या शिक्षण संस्थेची सुधारलेली आवृत्ती आहे. कलाभवनचा विस्तार खूप मोठा असून तेथे इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, विणकाम, नाट्यसंगीत, छायाचित्र या विविध विषयांचे शिक्षण दिले जाई.
 कलाभवनची इमारत ब्रिटिश स्थापत्यकलेवर आधारीत बांधलेली आहे. वरून पाहिले की या इमारतीचा आकार इंग्रजी अक्षर 'E' सारखा दिसतो. दगडी बांधकाम, गोल कमानी दरवाजे, उंच खिडक्या अशी ही दोन मजली इमारत ब्रिटिश वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. आजही कलाभवन चांगल्या स्थितीत आहे. २२०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या इमारतीचे मुख्य आर्किटेक्ट ए. एच. कोयल होते. तसेच आर्किटेक्ट चार्ल्स मॉट आणि आर. एफ. चिझम हेदेखील कलाभवनच्या प्रकल्पात सहभागी होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३५