पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जवळ असून 'महाराजांनी मूळत: क्रीडा विषयक कार्यक्रमासाठी म्हणून बांधला होता. या इमारतीचा अर्धा खर्च बडोदे सरकारने दिला होता. या क्लबच्या उद्घाटनप्रसंगी महाराज म्हणतात, “ अशा सामाजिक संस्थांचा मुख्य उपयोग समाजात प्रेमळ विचार विनिमय व परस्पर प्रेम संबंध उत्पन्न व्हावा हा असून, येथील सभासद या क्लबात येताना आपले त्रस्त मनोविकार बाहेर ठेवून व येथून बाहेर जातांना आतील प्रेमळ मनोविचार घेऊन जातील. अशी आशा व्यक्त करतो." पुढे याच भाषणात सयाजीराव स्त्रीयांबद्दल म्हणतात, “आताशा स्त्रियांनाही स्वत: चे क्लब असावेत असे फार वाटू लागले आहे. आधुनिक काळाने एक नव्याच प्रकारची स्त्रीजात निर्माण केली आहे आणि तिची अशी महत्वाकांक्षा दिसते की, आपण पुरुषांची नुसती बरेबरीच करून थांबू नये; पण श्रीपुरुषांमधली आजच्या नात्यात शक्य तर उलटापालटदेखील करून टाकावी. युरोपमध्ये खास स्त्रियांचेच असे स्वतंत्र क्लब निघालेले आहेत आणि हिंदी स्त्रियासुध्दा स्वतःच्या पाश्चिमात्य भगिनींचे अनुकरण झपाट्याने करू लागल्या आहेत. आपल्या सामाजिक परिस्थितीत होऊ घातलेला हा फरक पचनी पाडून घेण्याच्या खटपटी आपल्या समाजशरीकाला असह्य व घातुक अशा अपचनाची बाधा न झाली म्हणजे मिळवली.” (भाषण संग्रह १, खंड १, भाषण क्र. १७, पान नं २७)

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४१