पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रेकॉर्ड ठेवण्यासाठी १८९५ ला 'रेकॉर्ड टॉवर' या नावाची स्वतंत्र इमारत कोठी कचेरीसमोर बांधण्यात आली. रेकॉर्ड ठेवण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधावी लागणे म्हणजे महाराजांनी बडोद्यात केलेल्या सुधारणा आणि प्रगतीचे प्रमाणपत्रच होय.
 इ.स. १९०७ च्या सुमारास खाजगी खात्याकडील जुना सरकारवाड्याची इमारत कचेऱ्या व शाळांकरिता इमारत खात्याकडे सोपविण्यात आली. पुन्हा इ.स. १९१३ मध्ये खास दप्तरे ठेवण्यासाठी रेकॉर्ड टॉवरच्या धर्तीवर 'रेकॉर्ड ब्लॉक' नावाची नवीन इमारत बांधण्यात आली. त्याचवर्षी ऑफीस ब्लॉक नावाची आणखी एक लहानशी कचेरी बांधण्यात आली. हे दोन्ही टॉवर रेन्सान्स धर्तीवर बांधले होते. याचे नकाशे मद्रासचे शिल्पशास्त्रज्ञ मि. कॅबेल यांनी तयार केले होते. मि. कॉईल यांनी कोठीस जोडून हुजूर मध्यवर्ती कचेरी बांधली. यामध्ये मध्यवर्ती कचेरी आणि धारा सभेचा दिवाणखाना ही मुख्य दालनं आहेत. तर दप्तरखाना तळघरात आहे. ही कचेरी इंग्लंडच्या गॉथीक शैलीत बांधली आहे. महाराजांच्या कारकिर्दीच्या आधी सर्व कचेऱ्या एकाच ठिकाणी होत्या. परंतु महाराजांनी राज्यकारभारात आणि बडोद्यात केलेल्या सुधारणांमुळे कामकाज वाढत गेले आणि नवीन नवीन कचेऱ्या, इमारती बांधल्या गेल्या. परिणामी वेगवेगळ्या खात्याच्या कचेऱ्या वेगवेगळ्या ( separate) झाल्या. वाढत्या राज्यकारभारास दर ५-७ वर्षांनी एक नवीन इमारत लागू लागली. प्रसंगी कचेऱ्यांसाठी नवीन इमारत बांधण्याचे नकाशे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४३