पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे; परंतु अडचणी सहन केल्यावाचून फायदा व्हावयाचा नाही. अडचणी सोसून पुढे होणाऱ्या फायद्याकडे नजर दिल्यास, शेवटी कल्याण होणार आहे. आपण मानसिक व शारीरिक बलाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सुशिक्षित लोकांस शारीरिक शक्ती बरीच कमी असते. शिक्षणासंबंधी विचार करताना आपल्या शारीरिक संपत्तीकडे विशेष लक्ष द्यावे असे माझे मत आहे. आपल्याकडील लोकांचा शारीरिक संपत्तीचा -हास होत आहे की काय, हे मला सांगता येत नाही. तरी आपल्या लोकांस शारीरिक संपत्तीचीही विशेष जरूरी आहे. यासाठी आपण आपल्या मुलामुलींच्या शारीरिक बलाकडे विशेष लक्ष देऊन यथाशक्ती आपले कर्तव्य कराल अशी मला आशा वाटत आहे." (भाषणसंग्रह १, खंड १, भाषण क्र. ६७, पान नं. २३२)
१७. खंडेराव मार्केट (१९०६)
 ११४ वर्षापूर्वी सयाजीरावांनी प्रजेला एकाच ठिकाणी भाजीपाला, फळे आणि रोज लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी एकाच छताखाली मिळण्याची सोय करून देण्यासाठी खंडेराव मार्केटची निर्मिती केली. या मार्केटला आपल्या वडीलांचे म्हणजे 'महाराजा खंडेराव' यांचे नाव देऊन १९०६ मध्ये शहराच्या मध्यभागी खुल्या जागेत हे मार्केट सुरू केले. आज आपण ज्याला सुपर मार्केट म्हणतो तीच कल्पना महाराजांनी ११४ वर्षापूर्वी वापरली होती. ही इमारत चिरेबंदी दगडात बांधली आहे. या इमारतीच्या मध्यभागी असलेले दोन उंच मिनार या इमारतीची

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४६