पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा कॉलेजच्या इमारतीत हायस्कूलचे विद्यार्थी बसत होते. माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने कॉलेजच्या इमारतीत हायस्कूलच्या विद्यार्थांना ही जागा कमी पडू लागली. वाढता शिक्षणाचा प्रसार आणि अपूरी जागा यामुळे १९१३ मध्ये हायस्कूलसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे निश्चित झाले. पुढे १९१७ ला हायस्कूलची इमारत बांधून पूर्ण झाली. या इमारतीचे नकाशे सर विल्यम इमर्सन यांच्याकडून तयार करून घेतले होते. एक थर लाल विटांचा आणि दुसरा थर पांढऱ्या दगडांचा अशा क्रमाने रचना असलेल्या भिंतीची ही इमारत पौर्वात्य शिल्पकलेच्या पध्दतीने बांधली असल्याने बाह्यस्वरूप आपले लक्ष वेधून घेते. ही प्राचीन बायझेंटाईन (Byzantine ) रचना पध्दत आहे. कॉस्टॅटिनोपल शहरात या रचनेतील अनेक मंदिरे महाराजांनी पाहिली होती.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४८