पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहराची, राज्याची, देशाची किंवा खंडाची वास्तूविषयक शैली, जडणघडण किंवा स्वरूप याचा दर्जा बघत असताना वापरण्यात येणारा शब्दप्रयोग म्हणजे वास्तुकला होय. उदा., भारतीय वास्तुशैली, मुघल वास्तुशैली, हेमाडपंथी वास्तुशैली इ. काही वेळा भौगोलिक गरजेनुसार विकसित झालेल्या शैलीला प्रादेशिक ओळख प्राप्त होत असे. जसे केरळची वास्तुशैली, राजस्थानची वास्तुशैली. अनेकवेळा ज्याने शैली विकसित केली असेल त्याच्या नावे ती प्रसिध्द होते. जसे कर्बुझकर, बाळकृष्ण दोशी, चार्ल्स कोरिया, लॉरी बेकर इत्यादी.
महाराजांचा जगप्रवास
महाराजा सयाजीराव गायकवाडांनी १८८७ ते १९३८ पर्यंत २६ वेळा जगप्रवास केला. या जगप्रवासातून त्यांनी जो अनुभव मिळविला आणि देशाचार व लोकस्थितीचे अवलोकन केले, त्यातून सयाजीरावांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. युरोप दौरे केल्याने महाराजांमधील कलेची अभिरूची अधिकच जागृत झाली होती. युरोपियन राष्ट्रांप्रमाणे आपल्याही राज्याचे सुशोभीकरण करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ललितकलांना प्राधान्य देत त्यांनी बडोदा नगरीत सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू केले. बडोद्यात बांधलेल्या कलात्मक इमारतींमुळे केवळ कलासक्त लोकांनाच लाभ होणार नाही तर इतर लोकांनाही त्याचा व्यवहारिकदृष्ट्या लाभ होणार असल्याचा विश्वास महाराजांना होता.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ७