पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून सुंदर इमारतींच्या सांस्कृतिक महत्त्वाकडे मी दुर्लक्ष केले असते, तर माझ्या प्रजेवर मी अन्याय केला असे झाले असते. आपण हिंदी लोक कलाविद्य आहोत या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे व तो यथायोग्यही आहे. हिंदू व मुसलमान राजांनी यापूर्वी आपल्या देशात उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने म्हणून गाजवण्यासारख्या इमारती बांधून आपल्या देशाला अमूल्य अलंकाराचे लेणे चढविले आहे. या शिल्पकलेची किंमत पाश्चात्य कलेहून कोणत्याही प्रकारे कमी नाही. याच दृष्टीने बडोदे शहर सुंदर न शोभिवंत करण्याचा प्रयत्न मी केला आहे की, जेणेकरून या शहराबद्दल तुम्हाला अभिमान व प्रेम वाटावे. त्याचप्रमाणे शहरांतील रस्ते रुंद करण्यात, त्यात जागोजागी बगिचे बनविण्यात व इतर सुधारणा करण्यातही मी हीच जोडदृष्टी ठेवली आहे की, या सर्वांपासून लोकांना आरोग्याच्या दृष्टीने जसा व्यावहारिक उपयोग व्हावा, त्याचप्रमाणे सौंदर्यदृष्ट्या त्यांच्या संस्कृतीत भर पडावी.” यावरून वास्तुकलेबद्दल महाराजांचे सुरुवातीपासूनचे धोरण काय होते याची कल्पना येते.
महाराजांचे आवडते बांधकाम खाते
 बांधकाम खाते हे महाराजांचे आवडते खाते होते. महाराज कोणत्याही कचेरीत गेले की, “पब्लिक वर्क खात्यात " गेल्याशिवाय राहत नसत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम पाहणे हे त्यांच्या आवडीचे काम असे. बडोद्याचा सर्वांगीण

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ९