पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरुण मिरजकरबुवांचा स्वर उंच व चौथ्या पट्टीचा असे. या वरच्या पट्टीत मर्दानी व पहाडी आवाजात गायलेले बुवांचे गाणे सर्व लोकांना खूप आवडले. लोक या गाण्याने मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यानतंर मौलाबक्ष खाँचे आणि शेवटी फैजमहंमद खाँचे गाणे झाले.
 फैजमहंमद खाँची मैफील संपणार तेवढ्यात श्री. गणपतीबुवा ब्रम्हचारी तेथे हजर झाले. या साधूंना राजमाता जमनाबाई गुरुस्थानी मानीत असत. गणपतीबुवांनी मिरजकरांचे गाणं ऐकण्याची इच्छा प्रकट केली. परंतु सर्वात जेष्ठ गवई गायल्यानंतर कोणालाही गाता येत नसल्याच्या रिवाजमुळे फैजमहंमद खाँनी मीच गाणे ऐकवतो असे गणपतीबुवांना सांगितले. त्यावर गणपतीबुवांनी फैजमहंमद खाँचे गाणे अनेकदा ऐकले असल्याने मिरजकरांचेच गाणे ऐकण्याचा

हट्ट केला. गणपतीबुवांच्या इच्छेप्रमाणे जमनाबाईंनी दिलेल्या आदेशानुसार मिरजकरबुवांनी गाणे सुरू केले, आणि बघता बघता मैफील रंगात आली. चाहत्यांकडून वाहवा मिळू लागली. खुद्द राजमाता जमनाबाईंसमोर त्यांची मैफील रंगल्याने पुढे त्यांना याचा खूप फायदा झाला.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १४