पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 मुंबईहून कंपनी बडोद्यास गेली. सरकार दरबारी खेळ झाले. प्रत्येक सरकारी खेळाला खासे स्वाऱ्यांकरिता कोच, वगैरे सर्व व्यवस्था व बंदोबस्त सरकारी असे. वन्समोर करता श्री. महाराजांपुढे एक आणि महाराणींपुढे एक अशा बटणाच्या घंटा असत. विलायतेतील पध्दतीप्रमाणे अंकावर पडदा पडला म्हणजे औपचारिक टाळी द्यायची. वनस्मोअरला घंटा व्हायची. घंटेचा हा प्रकार विलायती नसून राजवाडी रसिकतेचा होता ! महाराज संगीत ऐकण्यास बसत; परंतु श्री. राणीसाहेबांना मात्र संगीताचा खरा शौक होता. त्या स्वतः सतार वाद्य वाजवित असत. राणीसाहेब जितक्या रसज्ञ व मार्मिक तितक्याच त्या तेजस्वी व पाहणाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी दरारा व आदरभाव निर्माण होत असे.
महाराजांकडून गंधर्व कंपनीला रु. ५००० वर्षासन
 बालगंधर्वांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची नाटक बडोदा दरबारीही रंगू लागली आणि त्यांना बडोदा संस्थानाचा राजाश्रय मिळाला. महाराजांकडून गंधर्व कंपनीला रु. ५००० वर्षासन मिळू लागले होते.

 बालगंधर्व बडोद्यात जात तेव्हा त्यांचा पहिला नाट्यप्रयोग राजवाड्यात खाजगीत होत असे. तेव्हा त्यांना एक हजार रुपये देऊन महाराज त्यांचा सन्मान करीत असत. त्यांच्या सर्व सहकलाकारांनाही तेवढाच मान दिला जाई. त्यांच्या सन्मानार्थ महाराज चार हजार रुपये देत असत. महाराजांच्या कुटुंबातल्या स्त्रियांकडून बालगंधर्वांना किमती शालू भेटीदाखल मिळत

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / १४