पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गंधर्वांच्या नाट्यप्रयोगांचे जे छायाचित्र सध्या उपलब्ध आहे त्यावरून त्यावेळसचे पडदे, दृश्यरचना आणि रंगमंचावरील सजावट यांच्यावर राजा रवी वर्माच्या चित्रांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी साकारलेली महाराष्ट्रीयन स्त्री आणि तिची वेषभूषा ही राजा रवी वर्माच्या सुरुवातीच्या खूप लोकप्रिय चित्रांवरून आणि बडोद्यात गंधर्वांच्या वास्तव्यात प्रत्यक्ष निरीक्षणातून घेतली असण्याचे नाकारता येत नाही. या फॅशन त्यावेळेस महाराष्ट्रात प्रचलित नव्हत्या त्या बालगंधर्व बडोद्यात राहून आल्यानंतर लोकप्रिय झाल्या अशा नोंदी सापडतात.
 त्यामुळे बालगंधर्वांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये बडोदा वास्तव्याचा मोठा वाटा मानला जातो. खुद्द बालगंधर्व महाराजा सयाजीराव गायकवाडांना आपले दैवत मानीत असत.
 नाटक मंडळांना आश्रय देण्याची प्रथा सयाजीरावांच्या काळात गंधर्व नाटक मंडळीला आश्रय दिल्यामुळे उत्तम प्रकारे पार पाडली गेली असे म्हणता येईल.
 "बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या आश्रयाखाली” अशी बालगंधर्वांच्या नाटक कंपनीची जाहिरात करण्याची अनुमती महाराजांनी दिल्याबद्दल बालगंधर्वांना याचा नेहमी अभिमान वाटत असे.
कलासक्त आणि सुधारणावादी सयाजीराव

गायकवाड घराणे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून संगीताचे आश्रयदाते म्हणून प्रसिध्द होते. तरीही सयाजीरावांच्या

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / १८